Monday, December 5, 2016

भेटशील?

भेटशील?
भटकलो तू अन मी जेथे
तेथल्या शोधते प्रीतीखुणा!
विरहात झुरते तुझ्या रे
भेटशील सख्या तेथे पुन्हा?

    ......प्रल्हाद दुधाळ.

Saturday, November 12, 2016

नोटांच्या चारोळ्या .

समजुतीचाच होता तो घोटाळा
कागदास मानत होतो संपत्ती..!
माणसांना टाळून जिवाभावाच्या
कागदी थप्पी कवटाळली होती..!
          ....... प्रल्हाद दुधाळ.
नोटांची चारोळी...

घराघरात गल्लीगल्लीत
चर्चा आहे फकस्त नोटांची
चिल्लरीस विचारेना कोणी
थांबली उलाढाल नोटांची
२ .
लोटली गर्दी बॅंकांच्या द्वारी
रात्रंदिन काळजी नोटांची
खिसे रिकामे वा भरलेले
छळतेय चिंता या नोटांची
 ३.
विसरले तहान व भूक
आस बदललेल्या नोटांची
गर्दी उसळली जेथे तेथे
करामत असे ही नोटांची
४.
भरून वाहती ते रकाने
किस्सा वा कहानी नोटांची
अगणित झाली कुटाळकी
काळ्या आणि पांढऱ्या नोटांची
५.
प्रश्न पडले का कशासाठी
अदलाबदल ही नोटांची
होईल भ्रष्ट चलन मुक्त
उलाढाल अशी ही नोटांची
६.
निपटण्या खोट्या व्यवहारा
आवश्यक ही कोंडी नोटांची
घडविण्या नव्या भारतास
यश दे चळवळ नोटांची
      ........ प्रल्हाद दुधाळ.

Monday, November 7, 2016

कृतघ्न

असचं असतं काळीज आईचं
सदा ह्रदयात पोरांसाठी माया!
वाढवते करून  हाडाची काडे
कृतघ्न पिढीला नाही दयामाया!
              ...... प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, November 2, 2016

उत्तर ..

ओवाळल्या नंतर आज विचारल बहिणीला
सांग ना तायडे तुला भेट मी काय देऊ ? ....
म्हणाली एकच मागते आयुष्यात भावड्या
आई - बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ ....
                      ......आशिष फाटक
भावाचे उत्तर ....
शब्द देतो तुला नाही देणार अंतर 
तायडे तुझ्या माझ्या ग आईवडिलांना!
मात्र तुझ्याकडून हवी एक शपथ...
सांभाळेन नवऱ्याच्या आईवडिलांना!
                             ........ प्रल्हाद दुधाळ.

Thursday, October 27, 2016

दिवाळी .

१.
झुलता आकाश कंदील दारावरी
काढली अंगणात सुरेख रांगोळी
वसुबारसी सवत्स धेनू पूजिली
सुरू झाला सण दिन दिन दिवाळी
२ .
झुलता आकाश कंदील दारावरी
नाते प्रकाशाशी सांगते ही दिवाळी
कष्टणाऱ्या हाता मिळतसे दिलासा
नात्यांचा महीमा  वाढवते दिवाळी
 ३.
झुलता आकाश कंदील दारावरी
 शुभेच्छांचे संदेश पाठोपाठ येती
  आता न दिवाळीत भेटीगाठी होती
   आभासी ओवाळणी आभासीच नाती
   ४.
दारात सडा वर रेखीव रांगोळी
झुलता आकाश कंदील दारावरी
दिव्यांच्या प्रकाशाने उजळे अंगण
 उत्सव दिवाळी उत्साह घरोघरी
 ५.
झुलता आकाशकंदील दारावरी
आगमन दिवाळीचे स्वागत करी
पंचपक्वाने  रेलचेल घरोघरी
रंक असो राव दिवाळी ही साजरी
६.
झुलता आकाशकंदील दारावरी
दिवाळी पहाट थंडीची हूडहूडी
अभ्यंगस्नान केले उटणे लावून
पेटवली लवंगी फटाक्यांची लडी
      ...... प्रल्हाद दुधाळ .

Tuesday, October 25, 2016

चांदण्यांनो ...

चांदण्यांनो .....
१.
लुकलुकणाऱ्या चांदण्यांनो या अंगणी
साजरी होते आहे आज येथे दिवाळी
प्रकाशित होवू दे जीवन हे सर्वांचे
नको किंचितही ती  छाया अंधारी काळी
२.
लुकलुकणाऱ्या चांदण्यांनो या अंगणी
रात्र आज वेगळी आनंद माझ्या मनी!
आरास करा सजवा सारा आसमंत
भेटणार प्रियतमा लाजरी साजणी !
३.
 लुकलुकणाऱ्या चांदण्यांनो या अंगणी
अंधार सारा हटू द्या माझ्या घरातुनी!
दाटेल उत्साह उजळता आसमंत
आशेचा धुमारा उठे मना मनातुनी!
४.
लुकलुकणाऱ्या चांदण्यांनो या अंगणी
काव्य विनोदात रात्र ही जागवू सारी
महफिल रंगू दे खळाळत्या हास्याने
स्वागतार्थ  ही  रांगोळी रेखाटली दारी
 ५.
लुकलुकणाऱ्या चांदण्यांनो या अंगणी
भेटीस तुमच्या अधीर एक  चांदणी!
चंद्राच्या साक्षीने वाट पाहते कधीची
दुसरी तिसरी ना असे माझी साजणी!  
 ६.
 लुकलुकणाऱ्या चांदण्यांनो या अंगणी
 सजते आसमंत धवल प्रकाश मंद!
 रातकिडे सुरात गातात किर्रगीत
 जागवितो रात्र आळवित मी मुक्तछंद!
            ..... प्रल्हाद दुधाळ .                                            


Monday, October 24, 2016

पहिल्या भेटीत.

पहिल्या भेटीत ....
१.
कधी कधी पहिल्या भेटीत
हव तसं  घडतच नाही
नीटपणाने टाकला फासा
दान योग्य ते पडत नाही
२.
कधी कधी पहिल्या भेटीत
ह्रदयांची  ती जुळते तार
संवादाने वाढे स्नेहबंध
प्रीतीचा तो महीमा अपार
 ३.
कधी कधी पहिल्या भेटीत
पडते एकमेकांची छाप
गुंतती  ह्रदये ह्रदयात
आणाभाका घेती वारेमाप
४.
कधी कधी पहिल्या भेटीत
नको ते आक्रीत घडते
होते ह्रदयाची खुली चोरी
बुध्दी मात्र गहाण पडते
५.
कधी कधी पहिल्या भेटीत
सहनशक्तीचा कडेलोट
बाहेर पडते साठलेले
क्रोधाचा प्रचंड होतो स्फोट
६.
कधी कधी पहिल्या भेटीत
मैत्रीचा करावा लागे अंत
विसरून सारे पुढे चालू
कशाला ती करायची खंत
७.
कधी कधी पहिल्या भेटीत
काढले जाते पूर्वीचे उट्टे
कधी शाब्दिक कधी हाताने
समोरच्यास पडती रट्टे
८ .
कधी कधी पहिल्या भेटीत
मनमोकळे ते बोलू नये
गुपित मनातच राखावे
परक्यासमोर खोलू नये
९ .
कधी कधी पहिल्या भेटीत
दाखवावी थोडीशी सबूरी
घाईत होईल फसगत
वाट्यास येईल मजबूरी
 १० .
 कधी कधी पहिल्या भेटीत
वाट्याला येतो अपेक्षाभंग
मनातले रहाते मनात
सोसावा लागतो तेजोभंग
 ११.
कधी कधी पहिल्या भेटीत
होवून जातो मैत्रीचा अंत
विसरून जावी घटना ती
बाळगू नये उगाच खंत
     .... प्रल्हाद दुधाळ
       

Sunday, October 23, 2016

नको पाहूस ....

१.
नको पाहूस मजला तू
मनात संशय धरून
ह्रदयातले सांगायचे
निघालो आज ठरवून
२ .
नको पाहूस मजला तू
एवढ्या नजरेने धुंद
घायाळ मी आहे असाही
झालीय चाल माझी मंद
 ३.
नको पाहूस मजला तू
नजरेत  काटे बोचरे
बोलतेस अशी विखारी
काळजास पडती चरे
४.
नको पाहूस मजला तू
असा रे मान वळवून
केंव्हाच ह्रदय तुझे ते
घेऊन गेले पळवून
५.
नको पाहूस मजला तू
जणू काय खाऊ की गिळू
तूच रे माझ्या ह्रदयात
नको कुणावर तू जळू
६.
नको पाहूस मजला तू
असे डोळे फाडू फाडून
मावणार नाही मी त्यात
हसू नको दात काढून
 ७.
नको पाहूस मजला तू
होईल ग नजरबंदी
लोकांना मात्र सांगशील
साधली आहे त्याने संधी
८.
नको पाहूस मजला तू
पुन्हा ते वाकून वाकून
गुंतलो आहे ग तुझ्यात
कर प्रीत डोळे झाकून
९.
नको पाहूस मजला तू
चष्म्यातून तिरस्काराच्या
प्रतिक्षेत अजून आहे
प्रेमरूपी पुरस्काराच्या
१०.
नको पाहूस मजला तू
गोरी तू अन मी हा काळा
जोडी तुझी माझी विजोड
संपवू प्रेमाचा हा चाळा
११.
नको पाहूस मजला तू
अश्रू ओघळती डोळ्यात
जायच होत अस तर
अडकवले का जाळ्यात
    ..... प्रल्हाद दुधाळ.

        

Saturday, October 22, 2016

पाऊले हळूवार

१.
न्यारी तुझी अदा नाजूक सुंदरी तू
 नारी ग ठूमक्याने होई अत्याचार...
आतुर कटाक्षास आशिक कित्येक
किती टाकशील पाउले हळूवार ...
२.
तुला पाहीले अन भान हरपले
ठरले तूच आयुष्याची जोडीदार...
उभा तिष्ठतो रस्त्यात त्याच रोजच्या
किती टाकशील पाऊले हळूवार...
 ३.
किती छळशील तुझ्या दिलवराला
आठवण तुझी येते मजला फार...
वाटेवर तुझ्या मी फुले अंथरते
किती टाकशील पाऊले हळूवार...
 ४.
किती टाकशील पाऊले हळूवार
ओझे झाले जड हे डोक्यावर फार..!
प्रचंड नाटकी तू आहेस ग नार
मुखवट्यास मुळी नाही भुलणार..!
५.
 किती टाकशील पाऊले हळूवार
काय आहेत तुझ्या मनात विचार?
बरे नाही गुंतणे विचारात फार
जडतील ते मनोकायिक आजार!
६.
हातात हात धरून ही फरफट
धेय्यहीन धावपळ जीणे बेकार!
विनाकारण असे पळणे आयुष्या
किती टाकशील पाऊले हळूवार!
७.
किती टाकशील पाऊले हळूवार
वेग तुझा असा कसा ग मंदावला....
चालण्यातली ऐट ती का हरवली
बदल पाहूनी जीव हा खंतावला....
       ....... प्रल्हाद दुधाळ.


Friday, October 21, 2016

ऋणानुबंध

१.
ऋणानुबंध म्हणु की प्रारब्ध
तुझी माझी येथे झाली ही भेट
संगतीने जीवनाचे या सोने
स्वर्गसुखानुभव मिळे थेट
२.
ऋणानुबंध म्हणु की प्रारब्ध
झाली तुम्हा मित्रांची ही गाठ
प्रेमात त्या चिंब असा मी न्हालो
फुटे आनंदाची मनात लाट
 ३ .
ऋणानुबंध म्हणु की प्रारब्ध
समस्या उभी पावलोपावली
जिध्दीने उभा संकटांसमोर
समस्यांची त्या नामी संधी झाली
 ४.
 ऋणानुबंध म्हणु की प्रारब्ध
मिळाले परिस्थितीचे ते चटके
अनुभवांची अनोखी शिदोरी
जगलो वेगळा आणि हटके
 ५.
 ऋणानुबंध म्हणु की प्रारब्ध
जुळल्या कायम आपल्या तारा
आता कशाला ती पर्वा कुणाची
खेळ प्रेमाचा हा सुंदर न्यारा
 ६.
ऋणानुबंध म्हणु की प्रारब्ध
आलो मी कुबेरांच्या दरबारी
मस्ती माहीती साहित्य खजिना
सदा डुंबतो आनंदसागरी
 ७.
    ऋणानुबंध म्हणु की प्रारब्ध
 वह्यापुस्तकांची वाहीली ओझी!
 शिकून सुसंस्कारात नहालो
अन्यथा धडगत कुठे माझी ?
 ८.
  ऋणानुबंध म्हणु की प्रारब्ध
 होते शिकाया माध्यम मराठी
 बोलल्यास कुणी मातृभाषेत
 पडत नाही या कपाळी आठी
  ९ .
  ऋणानुबंध म्हणु की प्रारब्ध
 भारतात नांदते लोकशाही
  बोलू लिहू शकतो मुक्तपणे
  व्यक्त होऊ शकते काहीबाही
            ...... प्रल्हाद दुधाळ.            
                       
        

Thursday, October 20, 2016

तुझ्या डोळ्यात ......

तुझ्या डोळ्यात ..... चारोळी महफिल ....
१.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
स्वप्न दिसे मम साकारले
हळूच हाती धरते हात
वाटे जीवन हे सार्थ झाले
२.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
गवसले जीवन रहस्य
कायमचेच फुलले माझ्या
चेहऱ्यावर हे स्मितहास्य

तुझ्या डोळ्यात न जाणो मला
स्वप्न सुखाचे असे दिसले
बाहूत विसावले हे तन
प्रारब्ध हे खुशीत हसले
४ .
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
सुखी आयुष्याचे होती भास!
वाटेवर डोळे अंथरते
सहजीवनाची आहे आस!
५.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
दिसे ते स्वप्न सत्य झालेले
जगते आता धुंदीत त्याच
जीवन हे रंगीन झालेले
६.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
दिसे उत्कट प्रितीचा रंग!
दर्शनाने तुझ्या मोहरतो
जागते मनी नवी उमंग!
७.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
आढळते ती वेडाची झाक!
झोपेत ओरडत उठते
आईला देते कर्कश्श हाक!
८.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
सप्तजन्माची दिसते साथ
सुख आणि दु:खात सखे ग
चालू घेऊन हे हाती हात
९.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
रात्र दिसते जागवलेली!
काढ सख्या गळ्यातले हात
बघ चांदणी रागावलेली!
१०.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
आढळते नजरेची भूल
होते अंतरात धडधड
अर्पितो तुला गुलाबी फूल
११.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
वाटे खूप झोप दाटलेली !
झोपून घे उशीर हा झाला
आहे गोधडी ही फाटलेली !
१२.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
रात्र वाटते ही पेंगलेली
जशी विश्वामित्राची समाधी
होती मेनकेने भंगलेली
.... प्रल्हाद दुधाळ.

Saturday, October 15, 2016

कोजागिरी.

कोजागिरी.
कोजागिरीचा चंद्र असा
चांदणे हे दुधाळ आज!
ये सखे महफिल जमवू
घालून हा रूपेरी साज!
     ..... प्रल्हाद दुधाळ.  

कोजागिरीच्या चांदण्यात
भेट पहिली तुझी माझी!
आज चंद्राच्या त्या साक्षीने
होईल आठवण ताजी!
      ..... प्रल्हाद दुधाळ.

आठवतो चेहरा तो तुझा  
कोजागिरीचा चंद्र पाहून 
उत्साही सारे जग असते 
डोळे शिणती अश्रू वाहून 
       .... प्रल्हाद दुधाळ .

काही सुखद काही दु:खद 
आठवणी त्या कोजागिरीच्या!
कधी फुलात कधी काट्यांत 
जीवनातल्या मुशाफिरीच्या!
      ..... प्रल्हाद दुधाळ.

साक्ष आहे या चंद्राची 
कोजागिरीची ती रात्र!
माझे तुझ्यात गुंतणे 
पोर्णिमा निमित्त मात्र!
      .... प्रल्हाद दुधाळ.

कोजागिरीच्या या चांदण्यात 
काव्य ओसंडले मनोमनी!
भरले  असे  दुधाचे प्याले 
 अजून एक रिचवा ना धनी!
        ..... प्रल्हाद दुधाळ .

पोर्णिमा आहे कोजागिरीची 
शरदाचे पिठोर चांदणे !
शृंगारिक हा माहोल असा 
नको अरसिकतेचे वागणे!

      .... प्रल्हाद दुधाळ.

Friday, October 14, 2016

सांगायचं असत ...

सांगायचं असत खूप काही
मात्र सदा तू अबोला धरते!
लागलोच चूकून बोलायला
लगेच सुरीने कांदा चिरते !
      .... प्रल्हाद दुधाळ .

सांगायचं असत खूप काही
कोरडा आहे पण माझा घसा!
आहे मनाने शिकारी वाघ मी
वागण्याने  मात्र  गरीब ससा!
      .... प्रल्हाद दुधाळ .

सांगायचं असत खूप काही
तोंडावरची माशी ती उठेना !
संधी  ती मिळाली जेंव्हा केंव्हा
कंठातून शब्दच की फुटेना!
        .... प्रल्हाद दुधाळ.

सांगायचं असत खूप काही
होत नाही शब्दांची जुळणी
बोल  बोल  म्हणतात सगळे
मी मात्र धरून बसते गुळणी
    .... प्रल्हाद दुधाळ .

सांगायचं असत खूप काही
सुचत नाहीत योग्य ते शब्द ..!
आधी असते बोलायची घाई
ऐनवेळी मात्र ही जीभ स्तब्ध..!
      .... प्रल्हाद दुधाळ .

सांगायचं असत खूप काही
ओठावर सहजी येत नाही
बोलायच असत मनातल
बोलताना जीभ रेटत नाही
    .........प्रल्हाद दुधाळ.

सांगायचं असत खूप काही 
ऐकायला कुणाला वेळ नाही 
बडबड करते हातवारे 
सांगते खरे हो मी वेडी नाही 
.... प्रल्हाद दुधाळ.

सोबत.

शब्दानाही हवी असते सोबत
 स्नेहाळ तर कधी तीक्ष्ण धारेची...!
नजरेत हवा  दर्यार्द ओलावा
तीक्ष्णता हवी सदैव त्या घारेची...!
      ..... प्रल्हाद दुधाळ .

शब्दानाही हवी असते सोबत
ताल सूर आणि आर्त भावनांची...!
साधला जातो तो मग सुसंवाद
जोडली जाते तार मनामनांची...!
      .... प्रल्हाद दुधाळ.

शब्दानाही हवी असते सोबत
समोरच्यास वश करण्यासाठी...!
शब्दानाही हवी असते ती स्पेस
हवे ते तसेच व्यक्त होण्यासाठी...!
        .... प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, September 14, 2016

शुभमंगल

शुभमंगल 
शुभमंगल सावधान ऐकता
लाजली हरकली ती मनोमनी!
शुभमुहूर्ते घालीन वरमाला
जन्मोजन्मीची होईल अर्धांगिनी!

       .... प्रल्हाद  दुधाळ. 

Tuesday, September 13, 2016

बहाणा

बहाणा
हल्ली प्रत्येक उत्सवात
 इश्वर केवळ बहाणा
 नाचतात ते बेसुमार
कर्कश डीजेचा धिंगाणा
   ......  प्रल्हाद दुधाळ

Monday, September 12, 2016

प्रश्न

डीजेवर झिंगाट, बाई वाड्यावर,
आरतीत मागणे संकटी पावावे !
बाप्पाला समजेचना काय करावे,
विघ्न घालवावे का भन्नाट नाचावे?
        .... प्रल्हाद दुधाळ.

Friday, September 9, 2016

लळा

लळा .
सवयीच्या झाल्या झळा
दु:खांनो या मला छळा
ना लागती आता कळा
तुमचा लागला लळा
      .... प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, August 17, 2016

पूजा

१.
बालबुद्धी आहे माझी देवा
एक हा प्रश्न विचारू का?
रक्षणकर्ता तू सकलांचा
दारी तुझ्या हे द्वारपाल का?
      ....... प्रल्हाद दुधाळ.
२.
गाभाऱ्यासमोर उभा बालक हा
हरकला पाहून देवाची पूजा!
होता लीन शिवशंभोच्या चरणी
लाभते जीवनी ती अनोखी उर्जा!

        ....... प्रल्हाद दुधाळ. 

Monday, August 15, 2016

झेंडा

शूर शिपाई मी त्या स्वातंत्र्य लढ्याचा
झेंडा खांद्यावर हा मिरवतो आहे!

वृध्दपणीही अशी देशाभिमानाची
ज्योत तेवती राखण्या खपतो आहे!
....... प्रल्हाद दुधाळ .



थकली गात्रे चालणे अवघड
तिरंगा आहे मज जीव की प्राण!

ठेवणार श्वासापर्यंत अंतिम
राष्ट्रध्वजाचा मी सार्थ अभिमान!
...... प्रल्हाद दुधाळ.

Tuesday, August 9, 2016

भग्न

भग्न.
साक्षीदार त्या गतवैभवाचा मी
आज जरी असा जीर्ण आणि भग्न!
स्मरतात दिवस ते समृध्दीचे
अवशेष देखता मन  विषण्ण!
        ..... प्रल्हाद दुधाळ.

वारसा.

वारसा.
भग्न अवशेषातही तो श्रीमंत
वैभवी भुतकाळ मिरवतोय!
शिल्पकलेचा तो समृध्द वारसा
दगडा दगडातुन सांगतोय!
      ..... प्रल्हाद दुधाळ.

Saturday, August 6, 2016

सृष्टी

पक्षी गाती किलबिल गाणी
सृष्टी नेसली शालू हिरवा...!
मेंढरांस कुरणात मेजवानी
वनी गुंजतो मंजूळ पावा...!
     ..... प्रल्हाद दुधाळ


Thursday, August 4, 2016

सक्षम तू

*******सक्षम तू*******
सबला तू नव्हेस अबला,
आहेस पूर्वापार सक्षम!
जाण स्वत:ला तू नारीशक्ती,
ठेव फक्त इरादे भक्कम!

---- प्रल्हाद दुधाळ पुणे.

Wednesday, August 3, 2016

स्वागत

स्वागत.
गोजिरवाण्या पावलांनी
लक्ष्मी माझ्या ही घरी आली...!
स्वागतासाठी सोनुलीच्या
सारी सृष्टी हिरवी झाली ...!
        .... प्रल्हाद दुधाळ.

विश्व

विश्व
चिमुकल्या नाजूक नाजूक पावलांनी
आनंदाने हे घर गेले माझे भरून...!
हसणे रडणे सुखद  बाल लीलानी
विश्व माझे गेले असे  सर्व व्यापून...!
                ....... प्रल्हाद दुधाळ.

दोरा

दोरा.
बाळा तुझ्या पायात हा
बांधला मी काळा दोरा...!
माझ्या छकुल्यास नको
बुऱ्या लागाया नजरा...!
      .... प्रल्हाद दुधाळ.

Sunday, July 31, 2016

का?

पायाखालची वाट जरी
पाऊल का अडखळते
मनात घालमेल अशी
नजर का घुटमळते
     प्रल्हाद दुधाळ 

Sunday, July 17, 2016

गाणे

मीच का,माझेच नशीब हे असे?
बस झाले तेच तेच रडगाणे...!
अंधारवाटा त्या चालता धैर्याने
नक्कीच जीवन होईल हे गाणे..!
     ..... प्रल्हाद दुधाळ.

देव

माणसांस ठेवून उपाशी
देवळात प्रसादांच्या राशी
काय अशा भक्तीस अर्थ
देव आहे रे तो तुझ्यापाशी
      ..... प्रल्हाद दुधाळ .

का?

का
इतकेच सांग एकदा
का एवढे छळले होते ?
नजरेने त्या पहिल्याच
घायाळ मी कळले होते!
     .... प्रल्हाद दुधाळ

Tuesday, July 12, 2016

महिमा

...............महिमा.............
नामाचा महिमा वर्णावा तो किती
 ब्रम्हानंदी टाळी घेता विठूनाम....!
नाचती ठेक्यात टाळ मृदंगाच्या
 भक्तीच्या या उत्सवी नुरते भान...!
               .....प्रल्हाद दुधाळ .

Sunday, July 10, 2016

एकांत

दिवसात एकदा 
एकांतात बसाव..!
आपल्याच मनाला 
कुशल ते पुसाव..!
.........  प्रल्हाद दुधाळ.

Saturday, July 9, 2016

भक्तीच्या चारोळ्या

भक्तीच्या चारोळ्या.
टाळ चिपळ्यांच्या त्या तालावर
वैष्णवांनी धरला आहे  ठेका...!
पुंडलिका वरदे हरी विठ्ठला
ऐकशील का भक्तांच्या हाका...?

ऐहिकाच्या नादात होतो
विसरलो विठ्ठल नाम ..!
वारीमधे  या आलो आता
आठवेना ते दुजे काम..!

जय जय राम कृष्ण हरी
नाही गेलो आम्ही पंढरी..!
नाम घेत नाचतो नी गातो
पांडुरंग येईल  आम्हा घरी..!

भागवताची पताका
घेवून वैष्णव नाचती..!
आषाढी नी कार्तिकी
ओसंडते द्वारी भक्ती..!

पायी चालती  हे भक्त
नसे कष्टाचे ते भान..!
पंढरीच्या वाटेवर
विसरे  भूक तहान..!

आज सारे गुंफतात
भक्तीभावाने या ओळी..!
घरबसल्या घडे वारी
लिहीताना ही चारोळी..!

माझा  सखा  तुकाराम
असो  तुझा ज्ञानेश्वर..!
एकेक कळस पाया
माहेर ते पंढरपूर..!

भजन कीर्तन
आमचे जीवन..!
देई  संजीवन
हे विठ्ठल नाम..!

धन्य धन्य ते कुबेर
महोत्सव हा सजला..!
चारोळीच्या निमित्ताने
भक्तीरस बरसला..!
...... प्रल्हाद दुधाळ.

Thursday, July 7, 2016

तांबड आकाश

तांबड आकाश

1. 
सांजेच तांबड आकाश
कुणासाठी बरं सजत असेल?
चांदणीच्या एका झलकेसाठी 

नटून थटून वाट बघत असेल!

2.
सांजेच तांबड आकाश
कुणासाठी बरं सजत असेल?
पाहून प्रीत तुझी माझी 

आठवत काही लाजत असेल!

3.
सांजेच तांबड आकाश
कुणासाठी बरं सजत असेल?
तू नक्की परत येशील 

विचार असा ते करत असेल!

4.
सांजेच तांबड आकाश
कुणासाठी बरं सजत असेल?
पाहून तुझा हा मुखडा 

स्वत:शी खुशीत हसत असेल!

5.
 सांजेच तांबड आकाश
कुणासाठी बरं सजत असेल?
तुझा माझा याराना बघून
कदाचित धुसफुसत असेल(?)


           ----प्रल्हाद  दुधाळ 

Wednesday, July 6, 2016

खेळ

....... खेळ .......
डोंबाऱ्याची इवली पोर
कौशल्य खेळाचे दावते....!
दोन वेळेच्या घासापायी
आयुष्य पणाला लावते....!
      .... प्रल्हाद दुधाळ

ओढ

....ओढ ....
ऐहिक सुखाचा मार्ग तो जिवघेणा
पांडुरंग नामाने डोळे ओलावले...!
आषाढी भिमेकाठी वैष्णवांचा मेळा
पाय पंढरीच्या वाटेने ओढावले...!
   ........ प्रल्हाद दुधाळ.

कारणाविना

आजकाल हे होतय मला काय
गुणगुणत स्वत:शी बोलायच..!
कारणाविनाच फुटतय  हसू
मनातल्या हिंदोळ्यावर डोलायच..!
      ...... प्रल्हाद दुधाळ .

Saturday, June 18, 2016

भास आभास

भास आभास

1.जिथे मिळाला स्नेहाळ मायेचा ओलावा
नकळत भावनेत वाहवत गेलो
माणसांची गर्दी भोवती उसळता
अंतरातुन मी तसा उधाणत गेलो

2.चेहरे न पाहीले ओळख जशी युगांची
संवादानेच  एकमेकां जाणत गेलो
सादेस प्रतिसाद मिळता तो पुरेसा
अंतरातुन मी तसा उधाणत गेलो

3.फुरसत  कुणाला ना कुणासाठी येथे
आभासी जगाला वास्तव मानत गेलो
लाट बेगडी चाहत्यांची शाब्दिक येता
अंतरातुन मी तसा उधाणत गेलो

4.खोटारडे मुखवटे कसे ओळखावे
ओझे  ते  मनी भावनांचे लादत गेलो
आभासी भास ते वास्तवात उतरता
अंतरातुन  मी तसा उधाणत गेलो
              प्रल्हाद दुधाळ

Sunday, June 12, 2016

चारोळ्या


 आलोय मेटाकुटीला पेलताना
इथल्या या जगण्यातले आव्हान...!
कसे काय राखत बसावे भान
घडोघडी सोडून आत्मसन्मान...?
           प्रल्हाद दुधाळ.

खिळवून ठेवायची ताकत
असते नक्कीच त्या सुगंधात
एकदा पडलो का जर फंदात
रंगून जातो त्या गुलाबी रंगात
        प्रल्हाद दुधाळ

चारोळ्यांच्या  गंधांची या
भूल अशीच पडते
थकलेले जरी तन
झोप मात्र ती उडते
        प्रल्हाद दुधाळ

बदल

ढग रिमझिम पाऊस पाहून
भल्याभल्यांचही हे असच होत...!
पथ्थरदिल माणसाचेसुध्दा
ह्रदय हळूवार होवून जात...!
 .....प्रल्हाद  दुधाळ

Wednesday, June 1, 2016

तो पाऊस

तो पाऊस.....चारोळ्या.
१) वाऱ्याबरोबर आला
    मस्त मातीचा सुगंध
     वाटले तो आला पण
     फसवणे त्याचा छंद
                   प्रल्हाद दुधाळ
२) आठवणीतला तो तसा
      हल्ली कधी भेटत नाही
      आस लावून बसते सदा
      त्याला काही वाटत नाही
                     प्रल्हाद दुधाळ
३) असा वेड लावी गंध
      माझी मी रहात नाही
      ओढ लागे अशी त्याची
       घडते आक्रीत काही
                      प्रल्हाद दुधाळ
४) कळत नाही त्याच्याशी
     काय आहे माझे नाते
     चाहूल लागता त्याची
      आत घालमेल होते
                 प्रल्हाद दुधाळ

Friday, May 27, 2016

स्वप्न

शिणले हे डोळे आता
वाट पाहून पाहून
पाहीले जे स्वप्न होते
गेले आसवात वाहून
   प्रल्हाद दुधाळ 

वाट

हमरस्त्यावर जाण्यासाठी
ओलांडावा लागतो घाट
घाबरू नये अंधारास
सापडेल नक्की वाट
   प्रल्हाद दुधाळ 

घाटा

गालातल्या खळयात अडकून
चुकल्या जर जीवनवाटा
आयुष्याच्या व्यवहारात तो
होईल नक्की जबर घाटा
     प्रल्हाद दुधाळ 

Wednesday, May 25, 2016

गाठी

वेळीच काढून टाकाव्या
अंतर्मनातल्या त्या गाठी
अन्यथा आयुष्यभराची
अशांती ती लागेल पाठी
      प्रल्हाद  दुधाळ 

डौल

सप्तरंगी इंद्रधनूपरी
कोणी केली उधळण ख़ास
चालतेस डौलात अशी की
बघता अडखळतो श्वास
 .......प्रल्हाद दुधाळ  

छंद

व्यक्तच व्हायच तर
कशाला वृत्त वा छंद ...!
भावना पोचवण्यास
लिहिते व्हावे बेबंद ...!
    प्रल्हाद  दुधाळ 

आठी

नियतीने तुझ्या माझ्या
बांधल्या आहेत गाठी ...!
मला बघता क्षणी का
कपाली तुझ्या ग आठी ...?
       प्रल्हाद  दुधाळ 

Friday, May 6, 2016

पलायन

पलायन.
छळणारे छळून गेले
जळणारे जळून गेले
सहनशीलता पाहून
शत्रू सारे पळून गेले
   ,,,,,प्रल्हाद दुधाळ.

Thursday, May 5, 2016

श्रद्धा

श्रध्दा
घडे अतर्क्य जीवनी
ध्यानीमनी जे नसते...!
निर्मिकाशी होता लीन
श्रध्दा अंतरी वसते...!
     ,,,,,,प्रल्हाद दुधाळ

Monday, April 18, 2016

चैतन्य

चैतन्य.
माया ममतेचा फिरता हात
घराचे या सुंदर होते गोकूळ
संवादानेच फुलती नातीगोती
जीवनातल्या चैतन्याचे मूळ
प्रल्हाद दुधाळ

स्पर्श


स्पर्श
रस्त्यातून चालावे कसे
वखवखल्या नजरेत
किळसवाणे स्पर्श असे
बरबटले वासनेत
  --्--   प्रल्हाद दुधाळ


Sunday, April 3, 2016

चारोळी

मोजक्या शब्दांची
अर्थपूर्ण मोळी
संवाद साधते
छोटीशी चारोळी
 .... प्रल्हाद दुधाळ

Friday, April 1, 2016

सय.

सय.
माहेराची सय येता माझ्या
मन बालपणात रमते...!
टूमदार तो कौलारी वाडा
सैर घोडागाडीची स्मरते..!
     प्रल्हाद दुधाळ


Sunday, March 27, 2016

नाते

*********नाते *******
जगावेगळे नाते तुझे नी माझे
स्वप्न तसे प्रत्यक्षात उतरावे....!
अजरामर व्हावी प्रेमकहाणी
कागदावर काळीज उतरावे....!
--------प्रल्हाद  दुधाळ.

Saturday, March 26, 2016

कृतघ्न

बिघडवण्यात निसर्गाला
माणसाचाच की हो हात....
उजाड केली वनसंपत्ती
ही  कृतघ्न मानव जमात....
      प्रल्हाद दुधाळ.

Monday, February 29, 2016

गाणे!

गाणे!
इच्छा अपेक्षांच्या ओझ्याखाली,
गुदमरून जाय जगणे,
सत्य स्वीकारून वास्तविक,
व्हावे आयुष्य आनंदी गाणे!
    ----प्रल्हाद  दुधाळ 

Sunday, February 28, 2016

दुर्दशा

रुसव्या फुगव्यानी त्या
आयुष्य हे करपते
सुंदरशा जीवनाची
मग दुर्दशा होते
 ----प्रल्हाद दुधाळ  

प्रवास

प्रवास होय सुखाचा
जर  सावली असेल 
पायवाट हमरस्ता 
साथ आपली असेल.
      प्रल्हाद दुधाल 

आस

जरी दाटले मळभ
तरी सोडू नये आस
कोंदटली जरी हवा
मातीचा येतोय वास.
     प्रल्हाद दुधाळ
 

वाट

बिलोरी ही अशी वाट
सोपी सहज वाटते
संगतीला जेंव्हा कोणी
जीवाभावाचे भेटते.
    --  प्रल्हाद दुधाळ.

Monday, February 8, 2016

प्रश्न

प्रश्न 
गुलाब तिच्यासाठी आणला 
आज आणलय चॉकलेट ...
नाहीच आजही झाली भेट 
तर जावे का घरीच थेट...?
....प्रल्हाद दुधाळ.

Thursday, February 4, 2016

ओल

विहीरीचे पाणी 
खोल खोल गेले ....
घशाला कोरड 
डोळे सदा ओले ...
....प्रल्हाद दुधाळ.

जिध्द

समोर भली मोठी समस्या जरी
करायलाच हवेत दोन हात!
जिध्दीनेच मिळते ती यशमाला
अर्ध्यात माघारीची नकोच बात!
.....प्रल्हाद दुधाळ

Tuesday, January 12, 2016

कारण

कारण तुझ्या आजचे
कालचे तुझे वागणे...
उद्या तुला घडवेन

आजचे तुझे जगणे...
     ...प्रल्हाद दुधाळ  

Sunday, January 10, 2016

कष्ट.

उज्वल भविष्यासाठी
कष्टाला पर्याय नाही...
यशाची चव हवी ना
जखमा मोजणे नाही...
       ....प्रल्हाद दुधाळ.

वसा.

वसा.
वाचते मी एक एक शब्द
ज्ञान अभ्यासाने वाढवते...!
भविष्य देशाचे घडविण्या
वसा सावित्रीचा मी जपते...!
           .....प्रल्हाद दुधाळ.

Saturday, January 9, 2016

बटा.

छान तुझी आहे अदा
छान हट्टी तुझ्या बटा...
कशासाठी सावरण्या
करतेस आटापिटा?
    ....प्रल्हाद दुधाळ.

चटका.

खिडकीत उभी अशी
चेहर्यावर तिच्या  बटा...
गुंतलो त्या खिडकीशी
लागे उन्हाचा चटका...
       ....प्रल्हाद दुधाळ.

नखरे.

उन कोवळे कोवळे
अंगावर वाटे बरे...
उभी कोण खिडकीत
चालू तिचे ते नखरे...
     ...प्रल्हाद दुधाळ.