Saturday, June 18, 2016

भास आभास

भास आभास

1.जिथे मिळाला स्नेहाळ मायेचा ओलावा
नकळत भावनेत वाहवत गेलो
माणसांची गर्दी भोवती उसळता
अंतरातुन मी तसा उधाणत गेलो

2.चेहरे न पाहीले ओळख जशी युगांची
संवादानेच  एकमेकां जाणत गेलो
सादेस प्रतिसाद मिळता तो पुरेसा
अंतरातुन मी तसा उधाणत गेलो

3.फुरसत  कुणाला ना कुणासाठी येथे
आभासी जगाला वास्तव मानत गेलो
लाट बेगडी चाहत्यांची शाब्दिक येता
अंतरातुन मी तसा उधाणत गेलो

4.खोटारडे मुखवटे कसे ओळखावे
ओझे  ते  मनी भावनांचे लादत गेलो
आभासी भास ते वास्तवात उतरता
अंतरातुन  मी तसा उधाणत गेलो
              प्रल्हाद दुधाळ

Sunday, June 12, 2016

चारोळ्या


 आलोय मेटाकुटीला पेलताना
इथल्या या जगण्यातले आव्हान...!
कसे काय राखत बसावे भान
घडोघडी सोडून आत्मसन्मान...?
           प्रल्हाद दुधाळ.

खिळवून ठेवायची ताकत
असते नक्कीच त्या सुगंधात
एकदा पडलो का जर फंदात
रंगून जातो त्या गुलाबी रंगात
        प्रल्हाद दुधाळ

चारोळ्यांच्या  गंधांची या
भूल अशीच पडते
थकलेले जरी तन
झोप मात्र ती उडते
        प्रल्हाद दुधाळ

बदल

ढग रिमझिम पाऊस पाहून
भल्याभल्यांचही हे असच होत...!
पथ्थरदिल माणसाचेसुध्दा
ह्रदय हळूवार होवून जात...!
 .....प्रल्हाद  दुधाळ

Wednesday, June 1, 2016

तो पाऊस

तो पाऊस.....चारोळ्या.
१) वाऱ्याबरोबर आला
    मस्त मातीचा सुगंध
     वाटले तो आला पण
     फसवणे त्याचा छंद
                   प्रल्हाद दुधाळ
२) आठवणीतला तो तसा
      हल्ली कधी भेटत नाही
      आस लावून बसते सदा
      त्याला काही वाटत नाही
                     प्रल्हाद दुधाळ
३) असा वेड लावी गंध
      माझी मी रहात नाही
      ओढ लागे अशी त्याची
       घडते आक्रीत काही
                      प्रल्हाद दुधाळ
४) कळत नाही त्याच्याशी
     काय आहे माझे नाते
     चाहूल लागता त्याची
      आत घालमेल होते
                 प्रल्हाद दुधाळ