Sunday, July 31, 2016

का?

पायाखालची वाट जरी
पाऊल का अडखळते
मनात घालमेल अशी
नजर का घुटमळते
     प्रल्हाद दुधाळ 

Sunday, July 17, 2016

गाणे

मीच का,माझेच नशीब हे असे?
बस झाले तेच तेच रडगाणे...!
अंधारवाटा त्या चालता धैर्याने
नक्कीच जीवन होईल हे गाणे..!
     ..... प्रल्हाद दुधाळ.

देव

माणसांस ठेवून उपाशी
देवळात प्रसादांच्या राशी
काय अशा भक्तीस अर्थ
देव आहे रे तो तुझ्यापाशी
      ..... प्रल्हाद दुधाळ .

का?

का
इतकेच सांग एकदा
का एवढे छळले होते ?
नजरेने त्या पहिल्याच
घायाळ मी कळले होते!
     .... प्रल्हाद दुधाळ

Tuesday, July 12, 2016

महिमा

...............महिमा.............
नामाचा महिमा वर्णावा तो किती
 ब्रम्हानंदी टाळी घेता विठूनाम....!
नाचती ठेक्यात टाळ मृदंगाच्या
 भक्तीच्या या उत्सवी नुरते भान...!
               .....प्रल्हाद दुधाळ .

Sunday, July 10, 2016

एकांत

दिवसात एकदा 
एकांतात बसाव..!
आपल्याच मनाला 
कुशल ते पुसाव..!
.........  प्रल्हाद दुधाळ.

Saturday, July 9, 2016

भक्तीच्या चारोळ्या

भक्तीच्या चारोळ्या.
टाळ चिपळ्यांच्या त्या तालावर
वैष्णवांनी धरला आहे  ठेका...!
पुंडलिका वरदे हरी विठ्ठला
ऐकशील का भक्तांच्या हाका...?

ऐहिकाच्या नादात होतो
विसरलो विठ्ठल नाम ..!
वारीमधे  या आलो आता
आठवेना ते दुजे काम..!

जय जय राम कृष्ण हरी
नाही गेलो आम्ही पंढरी..!
नाम घेत नाचतो नी गातो
पांडुरंग येईल  आम्हा घरी..!

भागवताची पताका
घेवून वैष्णव नाचती..!
आषाढी नी कार्तिकी
ओसंडते द्वारी भक्ती..!

पायी चालती  हे भक्त
नसे कष्टाचे ते भान..!
पंढरीच्या वाटेवर
विसरे  भूक तहान..!

आज सारे गुंफतात
भक्तीभावाने या ओळी..!
घरबसल्या घडे वारी
लिहीताना ही चारोळी..!

माझा  सखा  तुकाराम
असो  तुझा ज्ञानेश्वर..!
एकेक कळस पाया
माहेर ते पंढरपूर..!

भजन कीर्तन
आमचे जीवन..!
देई  संजीवन
हे विठ्ठल नाम..!

धन्य धन्य ते कुबेर
महोत्सव हा सजला..!
चारोळीच्या निमित्ताने
भक्तीरस बरसला..!
...... प्रल्हाद दुधाळ.

Thursday, July 7, 2016

तांबड आकाश

तांबड आकाश

1. 
सांजेच तांबड आकाश
कुणासाठी बरं सजत असेल?
चांदणीच्या एका झलकेसाठी 

नटून थटून वाट बघत असेल!

2.
सांजेच तांबड आकाश
कुणासाठी बरं सजत असेल?
पाहून प्रीत तुझी माझी 

आठवत काही लाजत असेल!

3.
सांजेच तांबड आकाश
कुणासाठी बरं सजत असेल?
तू नक्की परत येशील 

विचार असा ते करत असेल!

4.
सांजेच तांबड आकाश
कुणासाठी बरं सजत असेल?
पाहून तुझा हा मुखडा 

स्वत:शी खुशीत हसत असेल!

5.
 सांजेच तांबड आकाश
कुणासाठी बरं सजत असेल?
तुझा माझा याराना बघून
कदाचित धुसफुसत असेल(?)


           ----प्रल्हाद  दुधाळ 

Wednesday, July 6, 2016

खेळ

....... खेळ .......
डोंबाऱ्याची इवली पोर
कौशल्य खेळाचे दावते....!
दोन वेळेच्या घासापायी
आयुष्य पणाला लावते....!
      .... प्रल्हाद दुधाळ

ओढ

....ओढ ....
ऐहिक सुखाचा मार्ग तो जिवघेणा
पांडुरंग नामाने डोळे ओलावले...!
आषाढी भिमेकाठी वैष्णवांचा मेळा
पाय पंढरीच्या वाटेने ओढावले...!
   ........ प्रल्हाद दुधाळ.

कारणाविना

आजकाल हे होतय मला काय
गुणगुणत स्वत:शी बोलायच..!
कारणाविनाच फुटतय  हसू
मनातल्या हिंदोळ्यावर डोलायच..!
      ...... प्रल्हाद दुधाळ .