Thursday, October 20, 2016

तुझ्या डोळ्यात ......

तुझ्या डोळ्यात ..... चारोळी महफिल ....
१.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
स्वप्न दिसे मम साकारले
हळूच हाती धरते हात
वाटे जीवन हे सार्थ झाले
२.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
गवसले जीवन रहस्य
कायमचेच फुलले माझ्या
चेहऱ्यावर हे स्मितहास्य

तुझ्या डोळ्यात न जाणो मला
स्वप्न सुखाचे असे दिसले
बाहूत विसावले हे तन
प्रारब्ध हे खुशीत हसले
४ .
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
सुखी आयुष्याचे होती भास!
वाटेवर डोळे अंथरते
सहजीवनाची आहे आस!
५.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
दिसे ते स्वप्न सत्य झालेले
जगते आता धुंदीत त्याच
जीवन हे रंगीन झालेले
६.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
दिसे उत्कट प्रितीचा रंग!
दर्शनाने तुझ्या मोहरतो
जागते मनी नवी उमंग!
७.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
आढळते ती वेडाची झाक!
झोपेत ओरडत उठते
आईला देते कर्कश्श हाक!
८.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
सप्तजन्माची दिसते साथ
सुख आणि दु:खात सखे ग
चालू घेऊन हे हाती हात
९.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
रात्र दिसते जागवलेली!
काढ सख्या गळ्यातले हात
बघ चांदणी रागावलेली!
१०.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
आढळते नजरेची भूल
होते अंतरात धडधड
अर्पितो तुला गुलाबी फूल
११.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
वाटे खूप झोप दाटलेली !
झोपून घे उशीर हा झाला
आहे गोधडी ही फाटलेली !
१२.
तुझ्या डोळ्यात न जाणो मला
रात्र वाटते ही पेंगलेली
जशी विश्वामित्राची समाधी
होती मेनकेने भंगलेली
.... प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment